नवी दिल्ली - बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अकराव्यांदा ते पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी चित्तरंजन गगन यांनी मंगळवारी सायंकाळी याची घोषणा केली.
लालू यांच्या निवडीची औपचारिक घोषणा 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या दिवशी पक्षाची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेत लालू यांना नियुक्तीपत्र सोपविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लालू यांच्या वतीने त्यांचे पुत्र आणि विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी नामांकन दाखल केले. अध्यक्षपदासाठी लालू यांचा एकच अर्ज मिळाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तत्पूर्वी लालू यांचा नामांकन अर्ज सादर करण्यासंदर्भात सकाळी राजद कार्यालयात धावपळ सुरू होती. दुपारी विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव यांनी लालू यांच्या वतीने अर्ज सादर केला. यावेळी तेजप्रताप यादव, उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह, माजी मुख्यमंत्री राबडी देवी, भोला यादव, कांती सिंह आदी उपस्थित होते.