रांची - एखाद्या राजकीय नेत्याला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कारागृहात शक्यतो त्याला चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासन करत असतं, मात्र लालू प्रसाद यादव यांना अशी कोणतीच सुविधा मिळत नसल्याचं दिसत आहे. रांचीमधील कारागृहात बंद असलेल्या लालू प्रसाद यादव यांना एका साधारण कैद्याप्रमाणे राहावं लागत आहेत. स्वत: लालूप्रसाद यादव यांनी सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांकडे यासंबंधी तक्रार केली आहे. याआधी बुधवारी लालूंच्या दोन 'सेवाक-यांची' कारागृहातून सुटका करण्यात आली होती, जे खोट्या प्रकरणांसाठी कारागृहात बंद होते.
बुधवारी लालू प्रसाद यादव यांना सुनावणीसाठी सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने साडे तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली असतानाही लालूंच्या चेह-यावर मात्र काहीच काळजी दिसत नव्हती. याउलट न्यायाधीश शिवपाल सिंह यांच्यासोबत हसत खेळत चर्चा करताना ते दिसत होते. न्यायाधीश शिवपाल सिंह यांनीच लालू प्रसाद यादव यांना 89.27 लाखांच्या चारा घोटाळाप्रकरणी 6 जानेवारीला साडेतीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. सोबतच 10 लाखांचा दंडही ठोठावला होता.
न्यायालयात उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये चर्चा सुरु असताना सर्वांच्या चेह-यावर हसू होतं. जेव्हा न्यायाधीश शिवपाल यांनी लालूंना कारागृहात काही समस्या आहेत का विचारलं तेव्हा त्यांना आपल्या शैलीत कारागृह प्रशासन त्यांना पक्ष कार्यकर्ता आणि इतरांना भेटणयाची परवानगी देत नसल्याचं सांगितलं. यावर न्यायाधीशांना कारागृहाच्या नियमांचं पालन केलं तर त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल असं सांगितलं.
लालूंनी यावेळी आपल्याला साध्या कैद्याप्रमाणे वागवलं जात असल्याचीही तक्रार केली. यावर बोलताना न्यायाधीशांनी सर्वांसाठी नियम एकच असल्याचं सांगितलं.
चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चारा घोटाळ्यात लालूंना झालेली ही दुसरी शिक्षा आहे. जामिनासाठी त्यांना आता झारखंड उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.
या खटल्यात लालूंसह १६ आरोपींना २३ डिसेंबर रोजी दोषी ठरविण्यात आले होते. न्या. शिवपाल यांनी शनिवारी दुपारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमाने शिक्षा सुनावली. लालूंना भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये सर्व मिळून साडेतीन वर्षांचा कारावास देण्यात आला. दोन्ही कायद्यांखालील शिक्षा एकदमच भोगायच्या असल्याने लालूंचा तुरुंगवास साडेतीन वर्षांचा असेल. याखेरीज प्रत्येक कायद्यान्वये पाच लाख याप्रमाणे एकूण १० लाख रुपयांचा दंडही लालूंना झाला. दंड न भरल्यास आणखी सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल.