रांची: यावेळची मोठी बातमी झारखंडची राजधानी रांचीमधून येत आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या आणि पाचव्या नंबरच्या डोरंडा कोषागार प्रकरणात दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सीबीआय न्यायालयाने लालू प्रयाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी रोजी सीबीआय न्यायाधीश एसके शशी यांच्या विशेष न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी लालूंसह 38 दोषींना दोषी ठरवत शिक्षेवर सुनावणीची तारीख निश्चित केली होती. लालू यादव सध्या रांची रिम्समध्ये उपचार घेत आहेत.
विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आयपीसीच्या कलम 409, 420, 467, 468, 471, कट रचण्याशी संबंधित कलम 120बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(2) अंतर्गत दोषी ठरवले आहे. या प्रकरणात सीबीआयने एकूण 170 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर 26 सप्टेंबर 2005 रोजी 148 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. चार वेगवेगळ्या चारा घोटाळ्यात 14 वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह 99 जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.
23 वर्षे जुने प्रकरणचारा घोटाळ्याशी संबंधित या प्रकरणात 29 जानेवारी रोजी बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर, सीबीआय विशेष न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सुमारे 23 वर्षे जुने हे प्रकरण 1990 ते 1995 दरम्यान झारखंडच्या डोरंडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याबाबतचे आहे.
लालू प्रसाद चार प्रकरणात दोषीया खटल्यात 7 ऑगस्ट 2021 रोजी फिर्यादी पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला, ज्यामध्ये एकूण 575 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. तर बचाव पक्षाच्या वतीने 29 जानेवारी रोजी 110 आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाला. लालू प्रसाद यांचाही यात समावेश आहे. बचाव पक्षाचे वकील संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यात चाईबासा कोषागारातून बेकायदेशीर पैसे काढण्याचे दोन प्रकरण आहेत, लालू प्रसाद यांना देवघर आणि दुमका कोषागार प्रकरणात जामीन मिळाला आहे.
दोरांडा कोषागार प्रकरणात 99 आरोपीडोरांडा ट्रेझरीशी संबंधित घोटाळ्यात सुरुवातीला 170 आरोपी होते. यातील 55 आरोपींचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दीपेश चांडक आणि आरके दास यांच्यासह सात आरोपींना सीबीआयने साक्षीदार बनवले होते. दुसरीकडे, सुशील झा आणि पीके जयस्वाल यांनी न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच स्वत:ला दोषी मान्य केले होते. त्याचबरोबर या प्रकरणातील सहा आरोपी फरार आहेत. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद, माजी खासदार जगदीश शर्मा, डॉ. आर के राणा, तत्कालीन पीएसी अध्यक्ष ध्रुव भगत, तत्कालीन पशुसंवर्धन सचिव बेक ज्युलियस, पशुसंवर्धन विभागाचे सहायक संचालक डॉ केएम प्रसाद यांच्यासह 99 आरोपी आहेत.