नवी दिल्ली : चारा घोटाळा प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना जामीन मंजूर केला आहे. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंग यांनी शुक्रवारी 10 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तुरुंगात अर्धी शिक्षा पूर्ण केल्याच्या आधारे लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सर्व प्रकरणांमध्ये जामीनलालूप्रसाद यादव यांना आतापर्यंत एकूण 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले असून आता त्यांना सर्व प्रकरणांमध्ये जामीन मिळाला आहे. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करून लालू प्रसाद यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केलेला नाही, असे म्हटले होते. मात्र न्यायालयाने सीबीआयचा युक्तिवाद फेटाळून लावला.
सीबीआय न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती21 फेब्रुवारी रोजी रांची येथील सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना रांचीमधील डोरंडा कोषागारातून 139 कोटी अवैध काढल्याप्रकरणी दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, सीबीआय न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध लालू प्रसाद यादव यांनी 24 फेब्रुवारी रोजी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सध्या लालू प्रसाद यादव यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेतउच्च न्यायालयाच्या ज्या खंडपीठात लालू प्रसाद यादव यांचा खटला सूचीबद्ध होता, ते खंडपीठ 1 एप्रिल रोजी बसले नाही. त्यानंतर 8 एप्रिल रोजी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सीबीआयने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. सीबीआयची विनंती मान्य करत न्यायालयाने 22 एप्रिल ही सुनावणीची तारीख निश्चित केली होती. सध्या लालू प्रसाद यादव न्यायालयीन कोठडीत आहेत. आजारपणामुळे त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत.