रांची - एकाच दिवसात यादव कुटुंबाला शनिवारी दुसरा धक्का बसला. चारा घोटाळयाच्या प्रलंबित असलेल्या चार खटल्यांपैकी एका प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले. येत्या तीन जानेवारीला त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होईल. खच्चून भरलेल्या कोर्टरुममध्ये विशेष सीबीआय न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल सुनावला.
22 आरोपींपैकी सात जणांची निर्दोष सुटका करत लालूंसह 15 जणांना दोषी ठरवले. 1994 ते 1996 दरम्यान देवगड जिल्ह्याच्या कोषागारातून 84.5 लाख रुपये काढून घोटाळा केल्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. निकाल आल्यानंतर लगेचच पोलिसांनी लालूंसह सर्व आरोपींना ताब्यात घेतले. बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांसह अन्य सात आरोपींची निर्दोष मुक्ततता केली.
निकाल येण्याआधी लालुंनी देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला होता. आम्ही देशाच्या न्याय व्यवस्थेचा आदर करतो, आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही भाजपाची कारस्थाने यशस्वी होऊ देणार नाही. 2 जी घोटाळा, अशोक चव्हाणांच्या बाबतीत दिलासा देणारा जो निकाल आला तसेच माझ्या बाबतीत घडेल असे लालू म्हणाले. चारा घोटाळयात लालू यांच्या विरोधात एकूण पाच खटले दाखल असून त्यातील तीन प्रकरणे अजून प्रलंबित आहेत.
चायबासा कोषागारातून काढण्यात आलेल्या 37.5 कोटी रुपयांच्या घोटाळया प्रकरणी ऑक्टोंबर 2013 मध्ये लालूंना पाच वर्ष तुरुंगवास आणि 25 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. डिसेंबर 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला.
चारा घोटाळा प्रकरण नेमकं काय ?चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याच आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे.
लालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्री पद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलंहोतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलिही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती.
चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.