Lalu Prasad Yadav Health Update: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर नुकतेच किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य (daughter Rohini Acharya) यांनी त्यांना किडनी दान केली आहे. सिंगापूरमध्ये उपचार घेतल्यानंतर लालू प्रसाद यादव नुकतेच भारतात परतले आहेत. अशा स्थितीत लालूप्रसाद यादव यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक इच्छुक आहेत. त्यांच्या प्रकृतीची अपडेट जाणून घेण्याची साऱ्यांनाच इच्छा आहे. मात्र डॉक्टरांनीलालूप्रसाद यादव यांना कमी लोकांना भेटण्याचा सल्ला दिला आहे.
लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी सांगितले की, वडिलांना संसर्गापासून वाचवायचे आहे त्यामुळे त्यांना फार लोकांना भेटू दिले जाणार नाही. जे त्यांना भेटणार आहेत त्यांनादेखील तोंडाला मास्क लावूनच भेटावे लागणार आहे. रोहिणी आचार्य यांनी लालूप्रसाद यादव यांच्या चाहत्यांना आवाहन केले आहे, त्यांनी गर्दी करू नये. लालू यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
डॉक्टरांचा लालू प्रसाद यांना सल्ला
रोहिणी आचार्य यांनी ट्विट केले की, तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ही महत्त्वाची बाब म्हणजे आपले नेते लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट आहे. बाबांचे (लालू प्रसाद यादव यांचे) नुकतेच प्रत्योरोपणाचे ऑपरेशन झाले आहे. ही शस्त्रक्रिया अतिशय संवेदनशील असल्याने त्यांना आता पुढील काही दिवस कोणत्याही संसर्गापासून वाचवावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी फार लोकांना परवानगी मिळणार नाही, जास्त लोकांना भेटण्यास त्यांना मनाई केली आहे, असे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
लालूंची भेट घेणाऱ्यांनाही देण्यात आलाय सल्ला
पुढच्या ट्विटमध्ये लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी लिहिले की, डॉक्टरांनी सांगितले आहे की, एखाद्याला जर लालू प्रसाद यादव यांना भेटायचे असले तरी त्या प्रत्येकाला तोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे. बाबांना जेव्हा कोणीही भेटेल तेव्हा त्यांनीही मास्क घातलेच पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, दुसऱ्या ट्विटमध्ये रोहिणी आचार्य यांनी लिहिले की, लालू प्रसाद यादव यांच्यावर तुम्हा सर्व जनतेचे अमर्याद प्रेम आहे. माझ्या वतीने मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की, भारतात पोहोचल्यानंतर तुम्ही वडिलांना भेटता तेव्हा त्यांना भेटताना नक्की ही काळजी घ्या. तुम्ही प्रत्येक जण भेटाल तेव्हा मास्क घाला आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आम्हाला मदत करा.