Lalu Prasad Yadav ED Inquiry: बिहारमधील राजकीय गोंधळाला निर्णायक वळण लागल्यानंतर आज सर्वांच्या नजरा लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या ईडी चौकशीकडे लागल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू यादव यांची आज पाटणा येथील ईडीच्या झोनल ऑफिसमध्ये चौकशी होणार आहे. हे प्रकरण जमीन घोटाळ्याच्या बदल्यात नोकरीचे (Land for Job) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालू यादव चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार आहेत.
काल बिहारमध्ये राजकीय पेच शिगेला असताना दिल्ली उच्च न्यायालयाने जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी लालू कुटुंबातील काही सदस्यांना समन्स बजावले. लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी यादव आणि मुलगी हेमा यादव यांच्याशिवाय दिल्ली उच्च न्यायालयाने इतर काही लोकांनाही समन्स बजावले आहेत. पुढील महिन्याच्या ९ तारखेला त्यांनी न्यायालयात हजर राहावे, असे समन्समध्ये म्हटले आहे.
आरोपपत्रात कोणाचे नाव आहे?
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी सुरू असताना, या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची माहिती न्यायालयाला मिळाली. ईडीने पहिल्या आरोपपत्रात राबडी यादव, हेमा यादव, मिसा भारती, अमित कात्याली, हृदयानंद चौधरी आणि इतर काही जणांची नावे समाविष्ट केली आहेत. ईडी हे प्रकरण कसे पुढे नेते हे लालू कुटुंबाच्या विशेषतः तेजस्वी यादव यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
याचदरम्यान, रविवारी बिहारमध्ये एक रंजक राजकीय घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार सकाळी महाआघाडीचे नेते म्हणून मुख्यमंत्री होते, तर संध्याकाळी ते बिहारमध्येच एनडीएच्या सत्तेत मुख्यमंत्री झाली. भारतीय जनता पक्षाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह ते पुन्हा सत्तेवर आले. याशिवाय भाजप, जेडीयू, जीतन राम मांझी कोट्यातील नेते मंत्री झाले आहेत. लालू कुटुंबीयांना सत्तेतून हाकलून दिल्याने हा त्यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.