ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - हिंदू लोकंही मांस खातात, या लालू प्रसाद यादव यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाने जोरदार टीका केलेली असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांनीही त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. ' असे वक्तव्य करणारे लालू यादव हे कृष्णाचे नव्हे तर कंसाचे वंशज आहेत' अशी टीका योगगुरू रामदेव बाबा यांनी केली आहे.
लालू यादव यांनी गोमांसाबद्दल जे वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांनी यदुवंशाच्या नावाला काळिमा फासला आहे, अशी व्यक्ती कंसाची वंशज असू शकते. जनता त्यांना योग्य धडा शिकवेल' अशा शब्दांत बाबा रामदेव यांनी लालू यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका सुरू असतानाच काँग्रेस नेते दिग्विजय सिंग त्यांच्या बचावासाठी धावून आले आहेत. 'लालूजी यादव आहेत, यादव कृष्णाचे वंशज आहेत, ते अनेक वर्षापासून गो-मातेची सेवा करत आले आहेत. मी लालूजींच्या घरीही गो-मातेची सेवा झालेली पाहिली आहे, ते सच्चे गो-सेवक आहेत. त्यामुळे भाजपाने त्यांच्यावर असे आरोप करणे बंद करावे' असे ट्विट करत दिग्विजय सिंग यांनी लांलूची पाठराखण केली आहे.
घरात गोमांस साठवून ते खाल्ल्याच्या अफवेनंतर उत्तर प्रदेशीमधील दादरी येथील जमावाने मोहम्मद इखलाख या इसमाच्या घरावर हल्ला करून त्याला व त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली होती. या हल्ल्यात इखलाखचा मृत्यू झाला तर त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व प्रकरणामुळे वाद निर्माण झाला असून देशभरात तमावाचे वातावरण आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच लालू प्रसाद यादव यांनी 'काही हिंदू लोकही गोमांस खातात. जे लोक मांस खातात त्यांना गोमांस किंवा बक-याचे मांस याने काहीच फरक पडत नाही' असे वक्तव्य केले होते.