पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि RJD सुप्रीमो लालू प्रसाद यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. चारा घोटाळ्याच्या दोरांडा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे. हे प्रकरण डोरंडा कोषागारातून अवैधरित्या 139 कोटी रुपये काढण्याशी संबंधित आहे. याप्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे, लालू प्रसाद यादव यांच्या गावकऱ्यांनी ग्रामदैवताला साकडे घातले आहे. लालू प्रसाद यादव यांना कमीत कमी सजा मिळावी, म्हणून पूजा-आरती करण्यात येत आहे.
लालूप्रसाद यादव यांचं मूळ गाव गोलापगंज जिल्ह्यातील फूलवरिया हे आहे. या गावातील पंच मंदिरात सकाळीच ग्रामस्थांनी पूजा-आरती आणि होम हवनही केले. लालू प्रसाद यादव यांना कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी प्रार्थना ग्रामदैवताकडे गावकऱ्यांनी केली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी त्यांना कमीत कमी 7 वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
मंदिराचे पुजारी दयाशंकर पांडेय यांच्या नेतृत्वात मंदिरात वैदीक मंत्रांचा जप करत होम-हवन करण्यात आले. मंदिरातील दुर्गा माता, जय हनुमान, प्रभू श्री राम, भगवान शंकर यांचीही पूजा-अर्चना केली. त्यानंतर, होम हवनचेही आयोजन करण्यात आले आहे. नातेवाईक उमेश यादव यांनी म्हटले की, आम्हाला न्यायालयावर पूर्णपणे विश्वास आहे. लालू यादव यांना कमीत कमी शिक्षा सुनावण्यात येईल.
23 वर्षे जुने प्रकरण
चारा घोटाळ्याशी संबंधित या प्रकरणात 29 जानेवारी रोजी बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर, सीबीआय विशेष न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सुमारे 23 वर्षे जुने हे प्रकरण 1990 ते 1995 दरम्यान झारखंडच्या डोरांडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याबाबतचे आहे.