Tejashwi Yadav on Bihar Politics: महाराष्ट्रात भाजपाची मोठी खेळी यशस्वी होऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपासोबत सत्तास्थापना केली. त्यामुळे भाजपाच्या राजकीय चाणक्यनितीची जोरदार चर्चा गेले काही दिवस रंगली होती. पण असं असतानाच, बिहारमध्ये भाजपाला जोरदार धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष नितीश कुमार यांनी भाजपासोबतच्या सत्तेतून काढता पाय घेतला. आता उद्या बिहारच्या राज भवनात JD(U) आणि लालू प्रसाद यांची राष्ट्रीय जनता दल (RJD) यांचे महागठबंधन होऊन सरकार स्थापन होणार आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याची माहिती आहे. त्यासोबत दोन्ही पक्षांचे १४-१४ मंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी भाजपाला इशारा दिला आहे.
"बिहारचे लोक हे समाजवादी लोक आहेत. आमच्या पूर्वजांचा जो मौल्यवान वारसा आहे तो आम्ही इतर कोणालाही घेऊन जाऊ देणार आहोत का? तसं अजिबात होणार नाही. म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमार यांना धन्यवाद देतो. तसेच, आमच्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या लालू प्रसाद यादव यांचेही आम्ही आभार मानतो. ते आजारी आहेत, पण अशा अवस्थेत जेव्हा आम्ही RJD आणि JDU च्या 'महागठबंधन'बद्दलचा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेला तेव्हा त्यांनीही आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. कारण आम्हा सर्वांचा विचार एकच आहे की, आपल्याला भाजपाचा अजेंडा यशस्वी होऊ द्यायचा नाही. लालू प्रसाद यादव यांना सगळेच ओळखतात, त्यांनी अडवाणीजींचा 'रथ' रोखला होता, त्यामुळे आता आम्ही कोणत्याही किमतीत झुकणार नाही आणि घाबरणार नाही", अशी रोखठोक भूमिका तेजस्वी यादव यांनी मांडली.
नितीश कुमारांचे भाजपावर गंभीर आरोप
बिहारमध्ये भारतीय जनता पक्षासोबतची (BJP) युती तुटल्यानंतर, नितीश कुमार यांनी भाजपवर सडकून टीका केली. बिहारमध्ये भाजपाने जेडीयू संपवण्याचा कट रचला होता असा आरोप केला नितीश कुमारांनी केला. एवढेच नाही, तर भाजपने नेहमीच अपमानित केले, असेही नितीश कुमार म्हणाले. भाजपाने आमचे आमदार खरेदी करण्याचीही तयारी केली होती, असा धक्कादायक आरोपही नितीश कुमार यांनी केला.