बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी तेजस्वी यादव यांच्याविरोधात हनिमून वालं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता राजकारणानं जोर धरला आहे. तेजस्वी यादव यांचे ज्येष्ठ बंधू तेजप्रताप यादव यांनी जीतनराम मांझी यांना आपली उतारवयात काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसंच यावेळी त्यांनी मांझी यांना बिंग फोडण्याचीही धमकी दिली. "मांझी हे आमच्या शेजारी असलेल्या बंगल्यातच राहतात. त्यांच्या खोलीत काय काय होतं हे सर्व माहित आहे," असं देखील ते म्हणाले.लालू प्रसाद यादव यांचे कनिष्ठ पुत्र तेजस्वी यादव यांना हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांच्या हनिमून वाल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तेजस्वी यादव यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. परंतु त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि तेजप्रताप यादव यांनी मांझी यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. तसंच मांझी यांनी आपल्या उतारवयाची काळजी करावी आणि वेळीच स्वत:ला सांभाळावं, असं ते म्हणाले. तेजप्रताप यादव यांच्या वक्तव्यावर हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनीही पलटवार केला. "तेजप्रताप यादव यांनी आपल्या कोणत्या अयोग्य सवयींमुळे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांना घराबाहेर काढलं हे त्यांनी सांगावं. दिल्लीच्या फार्म हाऊसमध्ये कोणत्या कारणामुळे तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांना मारण्यात आलं होतं हे सांगावं," असं ते म्हणाले. तसंच तेजप्रताप यादव यांनी आपल्या मर्यादेत राहावं, असा इशारा देत जर आम्ही त्यांचं बिंग फोडलं तर लालू प्रसाद यादव यांची मुलं रस्त्यावर येतील असंही म्हटलं. नुकतंच जीतनराम मांझी यांनी काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्याबाबत हनिमूनवालं वक्तव्य केलं होतं. "जेव्हा देशात किंवा बिहारमध्ये काही संकट येतं तेव्हा हे तिन्ही नेते हनिमूनसाठी निघून जातात," असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान केलं होतं.
'हनिमून पॉलिटिक्स'च्या वक्तव्यावरून तेजप्रताप यादव यांचा संताप; पाहा कोणाला म्हणाले बिंग फोडेन?
By जयदीप दाभोळकर | Published: January 09, 2021 2:32 PM
जेव्हा देशात, बिहारमध्ये कोणतं संकट येतं तेव्हा राहुल गांधी, तेजस्वी यादव, चिराग पासवान हे हनिमूनसाठी बाहेर निघून जातात असं मांझी यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
ठळक मुद्देमांझी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलं होतं वादग्रस्त वक्तव्य हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांचाही तेजप्रताप यांच्यावर पलटवार