रांची : चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव डिप्रेशनमध्ये (नैराश्यात) गेले आहेत. रांची येथील राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (RIMS) ने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. रिम्सचे डॉ. आर. के. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा आजारपण व वातावरणातील बदलांमुळे नैराश्य येऊ शकतं.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये लालू प्रसाद यादव यांच्या बिघडलेल्या प्रकृतीसाठी त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना जबाबदार धरलं आहे. तसेच राजकारणातील घराणेशाहीवरून दोन्ही मुलांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे ते नैराश्यात असल्याचीही चर्चा सध्या रंगली आहे. एकंदरीत कुटुंबाची काळजी अन् मुलांमधली भाऊबंदकी यामुळे डिप्रेशन असल्याचं म्हटलं जातं. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.
डॉ. आर. के. श्रीवास्तव यांनी याआधीही लालू प्रसाद यादव नैराश्यात असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होती. पायावर सूज असल्याने चालताना त्यांना त्रास होत आहे. त्यातच डिप्रेशनची समस्याही पुढे आली आहे. उच्च रक्तदाबही आहे. मात्र, त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्याची गरज नसल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं होतं.
लालू प्रसाद यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत बिरसा मुंडा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले होते. सध्या कारागृहाच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्याला उपचारासाठी जामीन वाढवून मिळावा अशी मागणी लालूप्रसाद यांनी 25 ऑगस्ट रोजी केली होती मात्र न्यायालयाने तो नामंजूर करत 30 ऑगस्ट रोजी आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं आहे. डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. दुमका, देवघर आणि चायबासा कोषागरांचा यामध्ये सहभाग होता.