पटना, दि. 23- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष महारॅली २७ ऑगस्टला काढणार आहेत. या रॅलीची सध्या जोरदार तयारी सुरू असून, या रॅलीसाठी पाटण्यामध्ये विविध पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये तेजस्वी यादव यांचं ‘बाहुबली’ अवतारातील पोस्टर लावण्यात आलं आहे. पाटण्यात लावण्यात आलेल्या या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्टला ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट आणखी मजबूत करण्यासाठी ही रॅली आयोजित केल्याचं बोललं जातं आहे. या रॅलीच्या आधी लालू प्रसाद यादव सभा आयोजीत करून लोकांना आमंत्रित करत आहेत. तसंच लोकांनी रॅलीमध्ये सहभाग घेण्याचं तेजस्वी आणि तेजप्रताप यादव लोकांना आवाहन करत आहेत. काही दिवसांपूर्वी संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीतून बाहेर पडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेश केला आहे. नितीशकुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही विरोधकांच्या या महारॅलीत सहभागी होण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपाच्या मदतीने संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी बंडखोरी केली आहे. यादव हे सातत्याने नितीशकुमारांवर टीका करत आहेत. तसेच ते जेडीयूच्या बैठकीतही सहभागी झाले नव्हते. लालूप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्टला काढण्यात येणाऱ्या महारॅलीत ते सहभागी होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.