India Alliance Update: हरयाणा पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत झाले. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीत आता चलबिचल सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने ममता बॅनर्जींकडे नेतृत्व देण्याची मागणी केली. ममता बॅनर्जी यांनीही यासाठी तयारी दर्शवली. त्यात आता लालू प्रसाद यादव यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. लालू प्रसाद यादव यांचं विधान काँग्रेससाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीपासून इंडिया आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. हरयाणात काँग्रेसने मित्रपक्षांना दूर ठेवले. तर महाराष्ट्रातही जबर झटका बसला. त्यामुळे आता नेतृत्व बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लालू प्रसाद यादव काय म्हणाले?
"पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून निवडले पाहिजे. काँग्रेसच्या विरोधाला अर्थ नाही. ममतांनाच नेता बनवलं गेलं पाहिजे", असे लालू प्रसाद यादव म्हणाले. बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजद सत्तेत येणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
तेजस्वी यादवही सकारात्मक
ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व देण्याबद्दल राजदचे नेते आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी यापूर्वी म्हटलेले आहे की, "तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडे नेतृत्व देण्याबद्दल आक्षेप नाही. पण, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने व्हावा."
नेतृत्व करण्यास ममता बॅनर्जी तयार
काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे असे म्हटले आहे.
ममता बॅनर्जींनी हरयाणा, महाराष्ट्रातील निकालाबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, "मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांवर ती नीट चालवण्याची जबाबदारी आहे. ते चालवत नसतील, तर त्याला मी काय करू शकते. मी इतकंच म्हणेन की सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल."
पुढे ममता बॅनर्जी म्हणालेल्या की, "जर मला संधी दिली तर मी इंडिया आघाडी नीट कशी काम करेल, हे निश्चित करेल. मला बंगालबाहेर जायची इच्छा नाहीये, पण मी इथूनच नेतृत्व करू शकते", असेही त्या म्हणालेल्या आहेत.