नवी दिल्ली - चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांना गेल्याच महिन्यात जामीन मिळाला आहे. मात्र, आज सकाळी सकाळीच सीबीआयच्या टीमने त्यांच्या निवासस्थानासह 15 ठिकाणी छापे मारण्यास सुरुवात केली आहे. एक टीम राबडी देवींच्या सरकारी निवासस्थानीदेखील पोहोचली आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याच दरम्यान भाजपाने यावरून निशाणा साधत सवाल विचारला आहे. "131 प्लॉट, 30 फ्लॅट आणि 30 घरं... लालू कुटुंबाकडे एवढी संपत्ती आली कुठून?" असा सवाल भाजपा नेत्याने विचारला आहे.
लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे वारंवार आरोप करणारे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी पुन्हा एकदा यादव कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. "तुम्ही मला जमीन द्या, मी तुम्हाला नोकरी देईन, या धर्तीवर लालू यादव यांनी घोटाळा केला" असं म्हटलं आहे. तसेच हे प्रकरण लालू यादव रेल्वेमंत्री असताना घडले होते. त्यादरम्यान त्यांनी रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या नोकऱ्या देण्याच्या बदल्यात अनेक लोकांच्या जमिनी मिळवल्या होत्या असंही म्हटलं आहे.
सुशील कुमार मोदी यांनी "लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे तब्बल 131 भूखंड, 30 फ्लॅट आणि 30 हून अधिक घरं आहेत. 35 वर्षांच्या राजकीय करियरमध्ये इतकी संपत्ती नेमकी कशी आली?" असा प्रश्न विचारला आहे. तसेच विविध मुद्द्यांवरून देखील हल्लाबोल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. न्यूज एजन्सी एएनआयनुसार सीबीआयने आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलीविरोधात भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. लालू यांच्या या नव्या प्रकरणी दिल्ली ते बिहार असे एकूण 15 ठिकाणी छापेमारी सुरू आहे.