दिल्ली-
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी लालू प्रसाद यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. लालूंच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती तेजप्रताप यादव यांनी दिली आहे. पण त्याचवेळी तेजप्रताप यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयावर गंभीर आरोप देखील केले आहेत. लालूप्रसाद यादव यांना रुग्णालयात भगवत गीता पठण आणि ऐकण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप तेजप्रताप यांनी केला आहे.
"माझ्या वडिलांना रुग्णालयात श्रीमद्भगवद्गीता पठण आणि ऐकण्यापासून रोखण्यात आलं. खरंतर वडिलांना श्रीमद्भगवद्गीता पठणातून आनंद मिळतो. तशी आवड त्यांना आहे. पण त्यांना तसं करण्यापासून रोखणाऱ्या अज्ञानी व्यक्तीला याची कल्पना नाही की या पापाची परतफेड त्याला याच जन्मात करावी लागणार आहे", असं ट्विट तेजप्रताप यादव यांनी केलं आहे.
लालूंच्या प्रकृती अस्वास्थामुळे चिंतीत झालेल्या तेजप्रताप यांनी याआधी एक भावूक ट्विट केलं होतं. "लवकरात लवकर बरे होऊन घरी परता. तुम्ही आहात तर सारं आहे. मला फक्त माझे वडील हवे आहेत बाकी काही नको. राजकारणही नको आणि दुसरं काहीच नको. फक्त मला माझे वडील सुखरुप घरी येवोत", असं भावूक ट्विट तेजप्रताप यांनी केलं होतं.
लालूप्रसाद यांची थोरली कन्या मीसा भारती यांनी लालूंची तब्येत ठीक असल्याचं ट्विट करत त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. तसंच सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार देखील व्यक्त केले होते.