ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - बेनामी मालमत्तेच्या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. प्राप्तिकर विभागानं लालू कुटुंबीयांच्या मालकीच्या आतापर्यंत 10 मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच बिहार सरकारमध्ये मंत्रिपदावर असलेले तेजस्वी यादव आणि लालूंची कन्या मीसा भारती यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच प्राप्तिकर विभागानं लालूंची पत्नी राबडी देवींच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. प्राप्तिकर विभागानं बेनामी अॅक्टअंतर्गत ही कारवाई केली असून, लालूंची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव, मुलगी मीसा भारती आणि तिचे पती शैलेश, मुलगी रागिनी आणि मुलगी चंदा यांची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वीच लालू यांच्या मुलांशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आदेश सोमवारी देण्यात आले होते. बिहारचे नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुलांच्या बेनामी मालमत्तेवर प्राप्तिकर विभागानं कारवाई केली आहे. लालूंची कन्या आणि राज्यसभेची खासदार मीसा भारती यांची मालमत्ता प्राप्तिकर विभागानं बेनामी अॅक्टअंतर्गत जप्त केली आहे. त्यामुळे मीसा भारती आता स्वतःच्या मालमत्तेची विक्रीही करू शकणार नाहीत, तसेच त्यांना ती मालमत्ता भाडेतत्त्वावरही देता येणार नाही. काल मीसा भारतीच्या मालकीच्या 4 मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. आर्थिक अनियमितता आणि करचुकवेगिरीमुळे मीसा भारती यांच्या मालमत्तेवर ही कारवाई करण्यात आली होती. मीसा भारती बेनामी संपत्तीप्रकरणी आतापर्यंत दोनदा प्राप्तिकर विभागासमोर अनुपस्थित राहिल्या आहेत. तत्पूर्वी प्राप्तिकर विभागानं मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश यांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे बेनामी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारतींच्या अडचणीत वाढ झालीय. गेल्या काही दिवसांपूर्वी लालूंचे चिरंजीव तेज प्रताप यांच्या पेट्रोल पंपाचा परवानाही भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल)नं रद्द केला होता. तेज प्रताप यांनी चुकीच्या पद्धतीनं पेट्रोल पंपाचा परवाना मिळवल्याचा आरोप करत नोटीसही बजावण्यात आली होती.
लालूंच्या कुटुंबीयांची पुन्हा मालमत्ता जप्त, पत्नी आणि मुलांवर गुन्हा दाखल
By admin | Published: June 20, 2017 6:06 PM