ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - सिवान येथील पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्ये प्रकरणी लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादवला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. बिहार सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या तेज प्रतापवर राजदेव रंजन यांच्या मारेक-यांना पाठिशी घालण्याचा आरोप होत आहे.
बिहारमधील राजकारणी आणि गुन्हेगारांच्या संबंधांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चिंता व्यक्त केली. सिवान येथील पत्रकार राजदेव रंजन हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नितीश कुमार सरकारकडे उत्तर मागितले आहे. बिहारमध्ये निष्पक्ष सुनावणी होऊ शकत नाही. त्यामुळे खटला दिल्लीमध्ये चालवावा या मागणीसाठी राजदेव रंजन यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आलेल्या शहाबुद्दीनलाही नोटीस बजावली. शहाबुद्दीनचा शार्प शूटर या हत्येमध्ये सहभागी होता.
राजदेव रंजन हत्या प्रकरणातील एका वाँटेड आरोपी सोबतचा तेज प्रतापचा फोटो व्हायरल झाला आहे. यामुळे बिहारमध्ये विरोधी पक्षात असलेल्या भाजपला सत्ताधारी जदयू-राजद आघाडीवर हल्लाबलो करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.