पाटणा - मला घराबाहेर काढण्यासाठी नितीश कुमारांनी माझ्या बंगल्यात भूत पाठवली होती असा खळबळजनक आरोप तेज प्रताप यादव यांनी केला आहे. तेज प्रताप यादव राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आहे. सत्ता गेल्यानंतर सहा महिन्यांनी तेज प्रताप यादव यांनी त्यांचे अधिकृत सरकारी निवासस्थान सोडले आहे. मला त्रास देण्यासाठी नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी माझ्या बंगल्यात भूत सोडली होती असे तेज प्रतापने रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तेज प्रताप आरोग्य मंत्री होते. त्यावेळीत्यांना देशरत्न मार्गावरील 3 नंबर बंगला देण्यात आला होता. 2015 सालची बिहारची विधानसभा निवडणूक जदयू, राजद आणि काँग्रेस यांनी महाआघाडी करुन लढवली होती. त्यावेळी 243 सदस्यांच्या विधानसभेत या महाआघाडीला 178 जागा मिळाल्या होत्या. पण 20 महिन्यातच या महाआघाडीत फूट पडली आणि सरकार कोसळले. त्यानंतर नितीश यांनी जुलै महिन्यात भाजपाबरोबर आघाडी करुन सरकार स्थापन केले.
ऑगस्ट महिन्यात बिहार सरकारने राजद आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना बंगले रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तेज प्रताप यादव अति धार्मिक, दैववादी आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात यादव कुटुंबाविरोधात केंद्रीय पथकाकडून चौकशी सुरु असताना तेज प्रताप यांनी बंगल्यामध्ये दुश्मन मारन जपही केला होता असे सूत्रांनी सांगितले. दुसरी नोटीस मिळाल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी बंगला रिकामी करण्याचा निर्णय घेतला असे आरजेडीचे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी सांगितले. ऑक्टोंबर महिन्यात तेज प्रताप यादव यांना दुसरी नोटीस मिळाली. त्यामध्ये बंगल्याच्या मूळ भाडेयाच्या 15 पट जास्त दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला होता अशी माहिती आरजेडीमधील सूत्रांनी दिली.