ऑनलाइन लोकमत
गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून कोमात असलेल्या
हनुमंतअप्पा यांची प्रकृती ढासळतच गेली, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती. हनुमंतअप्पा हे असामान्य जवान असून त्यांनी दुर्दम्य धैर्य आणि संयमाचे दर्शन घडविले आहे, या शब्दांत मोदींनी प्रशंसा केली.
पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ १९,६०० फूट उंचीवरील लष्करी चौकीवर २ फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्यामुळे १० जवान बर्फाखाली गाडले गेले होते. हे सर्व जवान शहीद झाल्याची भीती लष्कराने वर्तवली होती. हाडे गोठवणाऱ्या थंडीत अतिशय प्रतिकूल वातावरण असताना लष्कराच्या शोधपथकाने सहा दिवसांपासून रात्रंदिवस अथक शोधमोहीम चालवली असता सोमवारी रात्री उशीरा बर्फ कापल्यानंतर त्या पथकाला हनुमंतअप्पांच्या हालचाली आढळून आल्या. त्यांना लगेच एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र सहा दिवस उणे ४५ अंश तापमानात बर्फाखाली गाडलेल्या अवस्थेत राहिल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने ते कोमात गेले होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. काल रुग्णालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार हनुमंतअप्पा यांची किडनी व यकृत काम करत नसून त्यांचा रक्तदाब वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच त्यांच्या मेंदुला ऑक्सिजन पुरवठाही नीट होत नव्हता आणि या सर्वात कहर म्हणजे त्यांना न्युमोनियाही झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आज सकाळी हनुमंतअप्पा यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने डॉक्टरांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि सकाळी पावणेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
महिलेने देऊ केली किडनी
हनुमंतअप्पा यांच्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करीत असताना उत्तर प्रदेशातील एका गृहिणीने या शूर जवानास आपली एक किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. निधी पांडे असे या महिलेचे नाव असून ती येथून उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. हनुमंतअप्पांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तसेच त्यांची किडनी व अन्य अवयव नीट काम करीत नसल्याचे वृत्त निधी यांनी टीव्हीवर पाहिले. देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या शूर जवानासाठी प्रार्थना नाही तर त्यापेक्षा काहीतरी ठोस केले पाहिजे, असे निधी यांना त्याक्षणाला वाटले. यानंतर निधी यांनी हेल्पलाईनवर फोन करून हनुमंतअप्पा यांच्यासाठी स्वत:ची किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आज त्यांचे निधन झाल्याने सर्व देशावर शोककळा पसरली आहे.
दिग्गजांनी वाहिली हनुमंतअप्पांना श्रद्धांजली
लान्सनायक हनुमंतअप्पा कोपड यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शहा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.