जबलपूर : हौशी बाइकस्वारांनी अनेक प्रकारे बाइक चालविण्याचे विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यात बाइकवर उभे राहणे, हँडल सोडून चालविणे, हँडलवर बसून चालविणे, पुढच्या चाकावर बसून चालविणे, कॅरिअरवर बसून चालविणे आदींचा समावेश आहे, परंतु जालना जिल्ह्यातील मांडवा गावचे लान्स नायक गजानन बबनराव मिसाळ यांनी बुधवारी बुलेटच्या मागच्या लाइटवर बसून १०० किलोमीटरहून अधिक अंतर चालविण्याचा विश्वविक्रम केला. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे त्यांनी केलेल्या या विश्वविक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे.गजानन मिसाळ जबलपूर येथील लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या डेअर डेव्हिल्स या टीमचे सदस्य आहेत. सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या गौरीशंकर परेड ग्राउंडवर त्यांनी हा विश्वविक्रम केला. यासाठी त्यांनी दोन वर्षे मेहनत घेतली होती. गजानन या विश्वविक्रमाचे श्रेय परमेश्वर, त्यांचे माता-पिता आणि डेअर डेव्हिल्स या ग्रुपला देतात. मूळ गावी शेतीची कामे करून घर चालविणारे त्यांचे आई-वडील हा विश्वविक्रम पाहण्यासाठी जबलपूरला आले होते. सोबत त्यांचा भाऊही आला होता. मुलाच्या या विश्वविक्रमाबाबत आपल्याला खूप अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. विश्वविक्रम पाहण्यासाठी मध्य कमांडचे वरिष्ठ लष्करी अधिकारी, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्या.संजय यादव आणि न्या.सुजॉय पॉल आदी मान्यवर उपस्थित होते.दोन तास २७ मिनिटांत केला पराक्रम सकाळी ८.३५ वाजता बाइकच्या मागच्या लाइटवर बसून ती चालविणे सुरू केले. त्यानंतर, त्यांनी काही मिनिटांत मैदानाचा ४५० मीटरचा एक फेरा पूर्ण केला. अगदी शांत व संयमाने बाइक चालवत त्यांनी एकेक करून मैदानात तब्बल २४९ फेऱ्या पूर्ण करीत तब्बल १११ किलोमीटरचे अंतर कापले. त्यांना दोन तास २७ मिनिटे आणि ५४ सेकंद इतका वेळ लागला. डेअर डेव्हिल्स या ग्रुपच्या नावावर आजवर एकूण २९ विश्वविक्रमांची नोंद झाली आहे.
शानदार! जबरदस्त!! झिंदाबाद!!! महाराष्ट्राच्या सुपुत्राने केला वर्ल्ड रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 5:24 AM