भारत आणि पाकिस्तानमध्ये सियाचिनवरून युद्ध झाले होते, या युद्धावेळी गस्तीवर असलेल्या २० जवानांना हिमस्खलनात शहीद व्हावे लागले होते. यापैकी एक लांसनायक चंद्रशेखर हर्बोला यांचा मृतदेह ३८ वर्षांनी सापडला आहे. 19 कुमाऊं रेजीमेंटचे ते एक भाग होते. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी दिनावेळीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सोमवारी त्यांचे पार्थिव हल्दानीला आणले जाणार आहे.
उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील द्वाराहाटच्या हाथीगुरचे ते रहिवासी होते. चंद्रशेखर हे 1975 मध्ये सैन्यात भरती झाले होते. तर 1984 मध्ये सियाचिन युद्धावेळी ऑपरेशन मेघदूत मिशनदरम्यान ते शहीद झाले होते. मे महिन्यात सियाचिनला गस्तीसाठी २० जवानांची तुकडी पाठविण्यात आली होती. या घटनेत सर्व जवान शहीद झाले होते. भारतीय सैन्याने आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. यामध्ये १५ जवानांचे मृतदेह सापडले होते. तर ५ बेपत्ता होते. यापैकीच एक चंद्रशेखर होते.
चंद्रशेखर यांच्या कुटुंबीयांना रविवारी मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्यासोबत आणखी एक जवानाचा मृतदेह सापडला आहे. चंद्रशेखर यांची पत्नी वीरांगना शांती देवी या सध्या हल्द्वानी येथील पॅडी मिलजवळील सरस्वती विहार कॉलनीत राहतात. एसडीएम मनीष कुमार आणि तहसीलदार संजय कुमार रविवारी त्यांच्या घरी पोहोचले. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले.
38 वर्षांनंतर शहीद जवानाचा मृतदेह सियाचीनमध्ये सापडला आहे. राज्य सरकारकडून ज्या सुविधा, सेवा शहीद जवानांच्या कुटुंबाला दिल्या जातात त्या सर्व देण्यात येतील. - मनीष कुमार सिंह, एसडीएम, हल्द्वानी