ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - मोदी सरकार देशाचा पाया असलेल्या शेतक-यांना कमकूवत करत असून लोकसभा निवडणुकीत उद्योजकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी भूसंपादन विधेयक आणले जात आहे असा घणाघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मोदींच्या धोरणामुळे शेतकरी व कामगार वर्ग घाबरला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसतर्फे किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, अध्यक्ष सोनिया गांधी व मनमोहन सिंग आदी नेत्यांनी संबोधित केले. सुमारे दोन महिने आत्मचिंतन करुन राहुल गांधी आज काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. राहुल गांधी आक्रमक शैलीत विरोधकांवर निशाणा साधला. देशाच्या विकासासाठी मेक इन इंडिया व उद्योग क्षेत्राच्या विस्ताराची आवश्यकता आहेच पण त्यासोबत शेतकरीही तितकाच आवश्यक आहे. हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतक-यांनी देशाच्या विकासाचा पाया रचला होता. मात्र मोदी हा पाया कमकुवत करत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
केंद्र सरकार फक्त श्रीमंत व उद्योजकांसाठीच काम करत असल्याचे शेतक-यांना वाटत असून त्यांची जमीन कधीही हिसकावून घेतली जाईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे असे त्यांनी सांगितले. मोदी शेतक-यांना त्यांची जमीन उद्योजकांना विकण्यासाठी भाग पाडत आहे. लोकसभा निवडणुकीत उद्योजकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठीच मोदी शेतक-यांची जमीन उद्योजकांना देत आहे. यासाठीच भूसंपादन विधेयक आणले गेले असे त्यांनी सांगितले. यूपीए सरकारचे भूसंपादन विधेयक शेतकरी हिताचे होते असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तर मोदी सरकारने खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली असून गेल्या 11 महिन्यांत सरकारने नेमके काय केले असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केला.