लँड फॉर जॉब प्रकरणात लालूप्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. लालू, राबरी आणि मिसा भारती यांच्यासह सर्व १६ आरोपींना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
याआधी लालू, राबडी देवी आणि मिसा भारती राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाले. लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने या सर्वांना समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले. लालू यादव रेल्वेमंत्री असताना लोकांना रेल्वेत नोकऱ्या देण्याऐवजी त्यांच्या जमिनी घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी १८ मे रोजी गुन्हा दाखल केला होता.
... तर देशातील कुठल्याच राज्यात स्थिरता राहणार नाही; अजित पवारांचे स्पष्ट बोल
सीबीआयने आपल्या आरोप पत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या. उमेदवारांनी थेट किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या माध्यमातून आरजेडी प्रमुख आणि तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांना नोकरीच्या बदल्यात बाजारभावापेक्षा खूपच कमी दराने जमिनी विकल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी २७ फेब्रुवारी रोजी प्रसाद यांची मुलगी मिसा भारतीसह सर्व आरोपींना समन्स बजावले होते आणि त्यांना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.