Land For Job Case: नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात CBI ने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात राऊस एव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्यासह 17 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना जमिननी घेऊन रेल्वेत ग्रुप डी पदावर नोकरी दिल्याचा आरोप आहे.
2021 मध्ये सीबीआयने तपास सुरू केला, त्यानुसार पाटण्यातील 12 लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचे प्रकरण समोर आले. यामध्ये अनेक जमिनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या नावे करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर 12 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
2006-07 मध्ये ए.के. इन्फोसिस्टम नावाच्या कंपनीने 6-7 जमिनींची नोंदणी केली होती. त्यावेळी नोंदणीमध्ये जमिनीची किंमत सुमारे 2 कोटी दाखवण्यात आली होती, तर बाजारभाव सुमारे 10 कोटी होता. यानंतर सीबीआयने नोकरीच्या बदल्यात जमिन प्रकरणात दोन एफआयआर नोंदवल्या होत्या. पहिल्या एफआयआरमध्ये लालू प्रसाद यादव आणि राबडी देवीसह इतर अनेकांविरुद्ध यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले, नंतर या प्रकरणात सीबीआयने दुसरी एफआयआर नोंदवली, ज्यात तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे.