पाटणा : बिहारमधील सत्तांतरानंतर आता सर्वांच्या नजरा राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या ईडी चौकशीकडे लागल्या आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात (Land For Job Scam) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी लालू प्रसाद यांची यांची ९ तासांपेक्षा जास्त चौकशी केली. आज ईडी त्यांचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी करणार आहे.
तेजस्वी यादव मंगळवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी २२ डिसेंबर आणि ५ जानेवारीला ईडीने तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी बोलावले होते, परंतु ते दोन्ही वेळेस ईडीसमोर हजर झाले नाहीत. यापूर्वी, ११ एप्रिल २०२३ रोजी ईजीने या प्रकरणी तेजस्वी यादव यांची ८ तास चौकशी केली होती.
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर एका दिवसानंतर ईडीने तेजस्वी यादव यांना चौकशीची नोटीस दिली आहे. लँड फॉर जॉब प्रकरणात ईडीने तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांना १९ जानेवारीला नोटीस पाठवली होती. सोमवारी लालू यादव यांची ईडीने तब्बल ९ तास चौकशी केली.
आरोपपत्रात कोणाचे नाव?दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी सुरू असताना, या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची माहिती न्यायालयाला मिळाली. ईडीने पहिल्या आरोपपत्रात राबडी यादव, हेमा यादव, मिसा भारती, अमित कात्याली, हृदयानंद चौधरी आणि इतर काही जणांची नावे समाविष्ट केली आहेत. ईडी हे प्रकरण कसे पुढे नेते, हे लालू कुटुंबाच्या विशेषतः तेजस्वी यादव यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
काय आहे लँड फॉर जॉब प्रकरण?लँड फॉर जॉब प्रकरण लालू प्रसाद यादव हे रेल्वे मंत्री असतानाच्या कार्यकाळातील संबंधित आहे. त्यावेळी रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ग्रुप डी पदांसाठी भरती होती. आरोपानुसार, याच काळात लालू यादव यांनी नियुक्त तरुणांच्या कुटुंबीयांकडून लाखो रुपयांची जमीन कवडीमोल भावाने खरेदी केली होती. ही बाब २००४ ते २००९ मधील आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर, सीबीआयने १८ मे २०२२ रोजी लालू यादव, राबडी देवी, मीसा भारती आणि तेजस्वी यादव यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.