- एस. पी. सिन्हापाटणा (बिहार) : रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. या प्रकरणात तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर बुधवारी दुपारी ईडीचे पथक माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी पोहोचले. यादरम्यान ईडीचे पथक निवासस्थानी सुमारे १० मिनिटे थांबले. ईडीच्या पथकाने राबडीदेवी आणि लालू यांच्या कन्या राज्यसभा खासदार मिसा भारती यांना नोटीस बजावली असून त्यांना ९ फेब्रुवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले आहे.
ईडीचे पथक आल्याची माहिती मिळताच राजदचे अनेक ज्येष्ठ नेते धावून आले. सोमवारी ईडीने लालूप्रसाद यादव यांची १० तास चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी तेजस्वी यादव यांची ८.३० तास चौकशी केली. राजदचे नेते, कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत पाटणा येथील ईडी कार्यालयाबाहेर थांबले होते. आता ईडी लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि त्यांची कन्या खासदार मीसा भारती यांची चौकशी करणार आहे. ईडीने या प्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. तर सीबीआयने ३ आरोपपत्र दाखल केले आहेत. याप्रकरणी अलीकडेच ईडीने व्यापारी अमित कात्यालला अटक केली होती. अमित कात्यालच्या चौकशीदरम्यान ईडीला अनेक नवीन माहिती मिळाली. त्यानंतर ईडीने लालूप्रसाद आणि तेजस्वी यादव यांची चौकशी केली आणि आता राबडीदेवी आणि त्यांची मुलगी मीसा भारती यांची चौकशी करणार आहे. लालूप्रसाद यांनी रेल्वेमंत्री असताना रेल्वेत नोकरीच्या बदल्यात स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या नावावर जमीन आणि फ्लॅट्सची रजिस्ट्री केल्याचा आरोप आहे.