देहराडून - भारत-चीन सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील चमोली शहरामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने जोशीमठमध्ये जमीन खचत आहे. भीतीमुळे लोकांना गावातून पलायन करावे लागत आहे. एकीकडे पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही आहे. तर दुसरीकडे अलकनंदा नदीतील भूस्खलन आणि अनियंत्रित बांधकामांमुळे ३२ गाव संकटात सापडले आहेत.
चमोलीमध्ये आतापर्यंत ५८४ घरे, हॉटेल या संकटाच्या फेऱ्यात सापडली आहे. आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी रंजित सिन्हा यांनी सांगितले की, स्थिती चिंताजनक आहे. जोशीमठचं निरीक्षण करून आलेल्या टेक्निकल टीमने अनेक सल्ले दिले आहेत. त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. टेक्निकल टीम भूस्खलनाचं सर्वात मोठं कारण हे जोशीमठ येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यलस्था नसणे हे आहे, असे सांगत आहे. त्यामुळे त्याचे सर्वप्रथम व्यवस्थापन करावे लागेल.
जोशीमठ येथे होत असलेल्या अनियंत्रित आणि अनियोजित बांधकामांमुळे भूस्खलनाचे प्रमाण वाढत आहे, असे टेक्निकल समितीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. केवळ जोशीमठच नाही तर बहुतांशी पर्वतीय शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील सुमारे ३२ गावांमध्ये जोशीमठसारखी परिस्थिती आहे. या गावातील १४८ कुटुंबांच्या विस्थापनाची फाईल सरकारी कार्यालयांमध्ये रेंगाळत आहे. दरम्यान, २०१२ पासून आतापर्यंत ४५ हून अधिक गावांमधील १४०० कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मात्र हे विस्थापन थांबलेलं नाही.
जोशीमठ येथे भूस्खलनासारखी स्थिती निर्माण झाल्याने लोक घाबरलेले आहेत. नगरातील प्रवेश द्वारावर असलेल्या एका मोठ्या हॉटेलजवळ भेग पडल्याने त्या खालील भागात राहणाऱ्या ५ ते १० कुटुंबांसाठी धोका निर्माण झाला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या ५ कुटुंबांचे प्रशासनाने स्थलांतर केले आहे.