कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जमीनीवरील अवैध कब्जाप्रकरणी आलेल्या एका तक्रारीनंतर, पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही तक्रार गांगुलीच्या स्वीय सचिव तान्या भट्टाचार्य ने दाखल केली आहे. या तक्रारीत, सुप्रियो भौमिक नावाच्या एका व्यक्तीने दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील महेशतला पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांगुलीच्या क्रिकेट अकादमीच्या नावे नोंदणीकृत असलेल्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, असे म्हणण्यात आले आहे.
पोलीस तक्रारीत भट्टाचार्य म्हणाल्या, सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांकडून विरोध केला गेल्यानंतर, भौमिक आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी अपशब्द वापरले. तान्या भट्टाचार्यने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आरोपीने तिला फोनवरही बोलावले आणि तिच्यासाठी अपशब्द वापरले. यानंतर आरोपीला महेशतला पोलीस ठाण्यात बोलावून चौकसी केली जात आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आोपीने झालेला आरोप फेटाळून लावत, अनैतिक कामांना विरोध केल्याने सुरक्षेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला अडकवल्याचा आरोप केला आहे. पोलीस उपाधीक्षक निरुपम घोष यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, 'आमच्याकडे तक्रार आली आहे, त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. आम्ही चौकशीनंतर योग्यती पावले उचलू.'