बंगळुरू : चंद्रावर उतरण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने भारताने आणखी एक पुढचे पाऊल टाकले असून, ‘चंद्रयान-३’चे लँडर, प्रोपल्शन मॉड्यूल स्वतंत्र करण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रग्यान) यांचा समावेश असलेले लँडर मॉड्यूल आता चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ कक्षेत आणखी खाली उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ २३ ऑगस्टला होणे अपेक्षित आहे.
पुढचा प्रवास कसा होईल?
शुक्रवारी लँडर मॉड्यूल दुपारी चार वाजता डीबूस्टिंग (वेग कमी करण्याची प्रक्रिया) होऊन चंद्राच्या कक्षेत थोडेसे खाली येण्याची शक्यता आहे. तेथे पेरील्युन (चंद्राच्या कक्षेचा सर्वात जवळचा बिंदू) ३० किमी आहे आणि अपोलून (चंद्राच्या कक्षेचा सर्वात दूरचा बिंदू) १०० किमी अंतरावर असेल जिथून चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न केला जाईल.
लिफ्ट देणाऱ्याचे काय?
विक्रम लँडर प्रग्यान रोव्हरला चंद्राजवळ पोहोचवणारे प्रोपल्शन मॉड्यूल (लिफ्ट देणारा) चालू कक्षेत कित्येक महिने/वर्षे आपला प्रवास सुरू ठेवेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, ‘लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्युलला म्हणाला, प्रवासासाठी धन्यवाद, मित्रा.’
आता सामन्याची अंतिम ओव्हर
हा एक खूप क्षण आहे आणि लँडर कसे कार्य करत आहे हे त्यातून दिसेल आणि त्याला चंद्राच्या जवळ आणले जाईल... त्यानंतर त्याला आवश्यक आदेश दिले जातील जेणेकरून त्याला सिग्नल मिळतील. आता सामन्याचे शेवटचे षटक सुरू होत आहे. विक्रम काय करेल आणि प्रग्यान बाहेर पडल्यावर काय करेल याची संपूर्ण जग वाट पाहत आहे. मीदेखील उत्सुकतेने वाट पाहत आहे. - एम. अन्नादुराई, संचालक, चंद्रयान-१ प्रकल्प
मंगळावरून झेपावेल, पोहोचेल पृथ्वीवर
वॉशिंग्टन : अमेरिकेची नासा ही अंतराळ संशोधन संस्था प्रथमच दुसऱ्या ग्रहावरून अवकाशयानाचे प्रक्षेपण करणार आहे. नासा मंगळ ग्रहावरून मार्स ॲसेंट व्हेइकल (एमएव्ही) रॉकेटद्वारे प्रक्षेपित करणार आहे. मंगळाच्या पृष्ठभागावरून गोळा केलेले दगड, माती आदींचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी एमएव्ही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
कधी हाेणार प्रयाेग?
एमएव्हीच्या सॉलिड रॉकेट मोटरची पहिली व दुसऱ्या टप्प्यातील चाचणी नासाने यशस्वीरीत्या पार पाडली. नासाच्या मार्शल स्पेस सेंटरमधून एमएव्हीचे नियंत्रण करण्यात येईल व ते जून २०२८ मध्ये लाँच केले जाईल. मंगळावरून ते २०३० सालापर्यंत पृथ्वीवर पोहोचेल असा अंदाज आहे. मंगळावर पाठविलेला पर्सिव्हरन्स रोव्हर सध्या तेथील पृष्ठभाग व जमिनीच्या पोटातील विविध नमुने गोळा करत आहे.