घरातील PM मोदींचा फोटो काढण्यासाठी घरमालक आणि भाडेकरुमध्ये तुफान राडा; थेट कमिश्नरपर्यंत पोहोचलं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 07:18 PM2022-03-29T19:18:14+5:302022-03-29T19:19:24+5:30
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मंगळवारी एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
इंदूर-
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मंगळवारी एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका भाडेकरूने घरमालकाविरोधात तक्रार केली असून आपल्या घरातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढण्यासाठी दबाव मालक आणत आहे आणि तसे न केल्यास घर रिकामं करण्याची धमकी देत असल्याचा आरोप केला आहे.
दर मंगळवारी रिगल तिराहे येथील पोलिस आयुक्त कार्यालयात जनसुनावणी घेतली जाते. आज झालेल्या जनसुनावणीत एक विचित्र प्रकरण समोर आलं, ज्यामुळे अधिकारीही चक्रावले आहेत. पीर गली येथील रहिवासी असलेल्या युसूफने जनसुनावणीत अधिकाऱ्यांसमोर तक्रार केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारसरणीनं प्रेरित होऊन त्यानं आपल्या घरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला आहे. पण घरमालक शरीफ मन्सूरी, याकूब मन्सूरी आणि सुलतान मन्सूरी हे मोदींचा फोटो काढून टाकण्यासाठी दबाव आणत आहेत आणि तसं न केल्यास घर खाली करण्याची धमकी देत आहेत, असा आरोप केला आहे.
आपण संघाच्या विचारसरणीचा दीर्घकाळापासून समर्थक असल्याचं युसूफचं म्हणणं आहे आणि त्यामुळे यातून प्रेरित होऊन त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो त्यांच्या घरी लावला आहे.
या प्रकरणी अतिरिक्त डीसीपी मनीषा पाठक सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तक्रारदारानं घरमालक माननीय पंतप्रधानांचा फोटो काढून टाकण्यासाठी दबाव आणत असल्याचं म्हटलं आहे. असं करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. तक्रार आल्यानंतर संबंधित स्थानिक पोलीस ठाण्याला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत'