उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन. १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 11:50 AM2023-08-04T11:50:06+5:302023-08-04T11:50:32+5:30
उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे.
उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यात पुन्हा एकदा भूस्खलनाची घटना घडली आहे. काही वेळापासून गौरीकुंडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे दरड कोसळल्याने सुमारे १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. टेकडीवरून सतत दगड कोसळत असल्याने बचाव पथकाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. रुद्रप्रयाग पोलिस, एसडीआरएफ, डीडीआरएफसह अनेक पथके बचावकार्यात गुंतली आहेत, मात्र बेपत्ता लोकांची माहिती अद्याप मिळालेली नाही.
हरियाणाच्या ५ जिल्ह्यांमध्ये ९३ FIR, १७६ जणांना अटक; २३०० व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर
गुरुवार संध्याकाळपासून रुद्रप्रयागच्या गौरीकुंडमध्ये पाऊस पडत आहे. रात्री उशिरा पाऊस अधिक बरसला. मुसळधार पावसामुळे डोंगरावर दरड कोसळून दोन दुकानांचे नुकसान झाले. दुकानात काम करणारे सुमारे १३ लोक ढिगाऱ्याखाली दबले . भूस्खलनाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एसडीआरएफ आणि डीडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. मात्र, मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची सुटका होऊ शकली नाही. यातील काही लोक स्थानिक तर काही नेपाळमधील आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास डाक पुलियाजवळ भूस्खलन झाले. माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्य थांबवावे लागले. आता सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आपत्ती व्यवस्थापन पथकाने एक यादी जारी केली असून त्यात १३ जणांची नावे आहेत. मात्र, हे लोक बेपत्ता आहेत की नदीत वाहून गेले आहेत की ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही.