गंगटोक - गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने देशातील विविध भागात धुमाकूळ घातला आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सिक्कीममधील ममखोला येथे सेवक-रंग्पो रेल्वे योजनेच्या सुरू असलेल्या कामादरम्यान, मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. येथे झालेल्या भूस्खलनामुळे दरड कोसळून अनेक मजूर अडकले. तर काही जण पाणी आणि चिखलासोबत वाहून गेले.मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दगड कोसळले. तसेच येथील कॅम्पही वाहून गेला. या दुर्घटनेत एकूण आठ मजूर वाहून गेले. तेव्हा स्थानिकांनी यापैकी तीन जणांना वाचवले आणि स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तर येथे काम करत असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला. मृत मजूर हा नेपाळमधील रहिवासी होता. त्याशिवाय दोन अन्य लोकांनाही गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले आहे. आता घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली आहे. तसेच अन्य पाच जणांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, सिक्कीमच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या भूस्थलनामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पोलिसांनी लोकांना महामार्गावर न येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. केवळ सिक्कीम आणि पश्चिम बंगालच नाही तर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासारख्या राज्यात सध्या निसर्गाचा कोप दिसून येत आहे. या राज्यांमधील वेगवेगळ्या भागांत भूस्खलन आणि ढगफुटीसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पिती येथे २०० हून अधिक पर्यटक अडकले आहेत.
मुसळधार पावसामुळे कोसळली दरड, रेल्वेच्या बोगद्यात काम करणारे मजूर गेले वाहून, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 3:26 PM