लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश यांच्या चार मारेकर्यांची ओळख पटली असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल, असा दावा कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करणार्या एसआयटीकडे पर्याप्त पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले. गृहमंत्री रेड्डी म्हणाले की, लंकेश हत्या प्रकरणात धागेदोरे सापडले आहेत. ४ जणांची ओळख पटली असून सर्व शंका दूर करण्यासाठी काही तांत्रिक डाटा मिळण्याची प्रतीक्षा आहे. गौरी लंके श (५५) यांची ५ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगळुरुत आपल्या घरासमोर हत्या झाली होती. या घराच्या समोरील एका सीसीटीव्हीत हे मारेकरी कैद झाल्याचे सांगितले जात आहे. एसआयटीला असे दिसून आले की, या मारेकर्यांनी यापूर्वीही गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात टेहळणी केली होती.
मारेकरी बाहेरच्या राज्यातील?एसआयटीला असे आढळून आले आहे की, मारेकरी हे बाहेरच्या राज्यातून बंगळुरुत आले होते. हत्येनंतर ते परत निघून गेले. बंगळुरुत या मारेकर्यांना स्थानिक सहकार्य मिळाले असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. लंकेश यांना ज्या ७.६५ मिमीच्या पिस्तोलने मारण्यात आले होते त्याचे स्त्रोत शोधण्यात येत आहे. कर्नाटकातील विजयपुरा पोलिसांच्या मदतीने एसआयटीने अवैध हत्यारांच्या रॅकेटचे सर्व्हेक्षण केले आहे. या हत्येसाठी विजयपुरातून हत्यार मिळाले होते असाही अंदाज बांधला जात आहे. या तपासातून महत्वपूर्ण माहिती हाती आल्याचा दावा आहे.