नवी दिल्ली : नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या व रामदेव बाबा अशा बड्या ‘कर्जबुडव्यां’च्या कंपन्यांना दिलेली ६८ हजार कोटींची कर्जे बँकांनी निर्लेखित (राईट आॅफ) केल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारात दिल्यानंतर काँग्रेस आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यात मंगळवारपासून सुरू झालेले तुंबळ वाक्युद्ध बुधवारीही सुरू होते.माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांच्या अर्जावर रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली होती. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही कर्जे आताच्या सरकारच्या काळात निर्लेखित केल्याचा आरोप करून समाजमाध्यमांतून तोफ डागली. एकीकडे कोरोनााविरुद्ध लढण्यासाठी सरकार जनतेपुढे हात पसरताना दुसरीकडे बड्या कर्जबुडव्यांची कर्जे निर्लेखित करीत आहे. हे दडविण्यासाठीच अर्थमंत्र्यांनी संसदेत प्रश्न विचारूनही त्यांची नावे जाहीर केली नव्हती, असा त्यांनी आरोप केला होता.सीतारामन यांनी मंगळवारी अनेक टिष्ट्वट करून काँग्रेसच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, काँग्रेसने सत्तेत असताना व आता विरोधात असतानाही भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी कधीही कटिबद्धता दाखविली नाही. आता विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याऐवजी काँग्रेस हातातील माहितीचा सोयिस्करपणे व संदर्भ सोडून वापर करून जनतेची दिशाभूल करीत आहे.
बड्या कर्जबुडव्यांची कर्जे निर्लेखित; काँग्रेस व सरकारमध्ये तुंबळ वाक्युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 6:22 AM