जेरुसलेम : कोरोनाला प्रतिबंध करण्याकरिता ज्या ज्येष्ठ नागरिकांना फायझर-बायोनटेकचा दुसरा बूस्टर डोस देण्यात आला, त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण एकच बूस्टर डोस दिलेल्या व्यक्तींपेक्षा ७८ टक्क्यांनी कमी असल्याचे आढळून आले. इस्रायलने केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला.इस्रायलमधील क्लॅलिट हेल्थ सर्व्हिसेस या संस्थेने सांगितले की, या पाहणीत ६० ते १०० वर्षे वयोगटातील सुमारे ५ लाख ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील ५८ टक्के लोकांनी दुसरा तर ४२ टक्के लोकांनी एकच बूस्टर डोस घेतला होता. दुसरा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांपैकी फक्त ९२ जणांचा मृत्यू झाला, तर एकच बूस्टर डोस घेतलेल्यांपैकी २३२ जण मरण पावले.
क्लॅलिटच्या पाहणीतून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, दुसरा बूस्टर डोस हा जीवरक्षक ठरला आहे. इस्रायलमधील ज्या ज्येष्ठ नागरिकांनी मॉडेर्नाची लस घेतली होती, त्यांना या पाहणीतून वगळण्यात आले होते. कोरोना साथ रोखण्यासाठी इस्रायलच्या शास्त्रज्ञांनीही गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रकारचे संशोधन सुरू ठेवले आहे.
विरोध मावळू लागलाकोरोनाची लस दिल्यानंतर बूस्टर डोसही देण्यात यावा, या मताला काही शास्त्रज्ञांनी विरोध केला होता. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली. भारतामध्ये विशिष्ट वयोगटातील लोकांना प्रीकाॅशन डोस देण्यात येऊ लागला. इस्रायलने आपल्या ज्येष्ठ नागरिकांना दोन बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला. या बूस्टर डोसचे फायदे लक्षात आल्यानंतर त्याला आधी असलेला विरोध मावळू लागला आहे.——————