ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ८ - नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने मोठया प्रमाणात सैन्य तैनाती सुरु केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ रहाणा-या नागरीकांना आणखी आतमधल्या भागांमध्ये पाठवण्यात येत आहे अशी गुप्तचरांकडून माहिती मिळाली आहे.
२९ सप्टेंबरला भारतीय सैन्याने पीओकेमधील दहशतवाद्यांच्या लाँच पॅडला टार्गेट केले पुन्हा अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाकिस्तानकडून ही पावले उचलली जात असण्याची दाट शक्यता आहे. काश्मीर खो-यापेक्षा जम्मूला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमावर्ती भागामध्ये या हालचाली अधिक प्रमाणात सुरु आहेत.
भारतानेही नियंत्रण रेषेवर आपल्या सैन्याची संख्या वाढवली असून, जम्मू-पंजाब येथील सीमावर्ती गावांमध्ये रहाणा-या नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. जम्मू लागून असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना भारतीय सैन्य पुन्हा लक्ष्य करेल अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. भारतीय सुरक्षा दलांसाठी चिंता वाढवणारी बाब म्हणजे नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्या आहेत. त्यामुळे येणा-या दिवसांमध्ये मोठया प्रमाणावर घुसखोरीचा प्रयत्न होऊ शकतो.