इंदूर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. याशिवाय ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसनं आरोग्य क्षेत्राची झोप उडवली आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईटची फंगस जीवघेणा ठरत असल्यानं वैद्यकीय क्षेत्र चिंतेत आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका महिलेच्या डोक्यातून आतापर्यंतचा सर्वात मोठा व्हाईट फंगस काढण्यात आला आहे. हा व्हाईट फंगसचा आकार पाहून डॉक्टरदेखील चक्रावले आहेत.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आता ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसदेखील आढळून आला आहे. धार जिल्ह्यातील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तिनं कोरोनावार मात केली. त्यानंतर ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशनसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ऑपरेशन करून डॉक्टरांनी ट्यूमर काढलं. नंतर त्याची बायॉस्पी करण्यात आली. त्यात डॉक्टरांना व्हाईट फंगस आढळून आला. हा जगातील सर्वात मोठा व्हाईट फंगस समजला जात असून त्याचा आकार ८.६x४x४.६ सेंटिमीटर इतका आहे.
संबंधित महिलेला रक्ताच्या माध्यमातून फंगसची लागण झाली. सर्वसाधारणपणे फंगसची लक्षणं नाक आणि डोळ्यांमध्ये दिसून येतात. मात्र संबंधित महिलेच्या बाबतीत असं काही घडलं नाही. इंदूरमध्ये याआधी व्हाईट फंगसचे अनेक रुग्ण सापडले आहेत. मात्र पोस्ट कोविड रुग्णात अशा प्रकारचा संसर्ग पहिल्यांदाच आढळून आला आहे. याशिवाय इंदूरमध्ये ब्लॅक आणि ग्रीन फंगसदेखील आढळून आले आहेत. ग्रीन फंगसचा देशातील पहिला रुग्ण इंदूरमध्येच आढळून आला आहे.