पुणे : लेझरच्या मदतीने निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक भेद करणाऱ्या रणगाडाभेदी लाम्ब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी गुरुवारी अहमदनगर येथील केके रेंज वर करण्यात आली. अर्जुन रणगाड्यातून ही चाचणी करण्यात आली. डीआरडीओच्या पुण्यातील एआरडीई आणि एचईएमआरएल या प्रयोगशाळांमध्ये या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील आरमामेन्ट रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इस्टाब्लिशमेंट (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबरेटरी (एचईएमआरएल) या दोन प्रयोगशाळांमध्ये हे क्षेपणास्र विकसित करण्यात आले आहे. क्षेपणास्त्राची रचना, त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान विकसित करणे तसेच क्षेपणास्त्र डागण्यासाठी आवश्यक असलेली लॉन्चिंग यंत्रणा एआरडीई या संस्थेत निर्माण करण्यात आली आहे. तर या क्षेपणास्त्रात आवश्यक असणारा दारूगोळा तसेच विविध तांत्रिक गोष्टींची निर्मिती एचईएमआरएल या प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. नुकतेच कमी अंतरावरील रणगाडा भेदण्यासाठीची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आता गुरूवारी (दि.1) लांब अंतरावरील शत्रू रणगाडा भेदण्याबाबत यशस्वी चाचणी लष्करातर्फे करण्यात आली. --------------------रणगाडा युद्धात वेगाने आणि अचूक कारवाई करण्यासाठी रणगाडाभेदी क्षेपणास्त्र वापतात. या क्षेपणास्त्रामुळे युद्धात भारतीय रणगाडे जास्त प्रभावी ठरणार आहेत. शत्रुच्या रणगाड्याचा लेझरच्या मदतीने वेध घेऊन क्षेपणास्त्र हल्ला केला जातो. यात शत्रुच्या रणगाड्याने जागा बदलली तरी लेझरच्या मदतीने लक्ष्याचा पाठलाग करत त्याला उद्धवस्त करणे आता शक्य होणार आहे.
...लेझर गायडेड रणगाडाभेदी क्षेपणास्त्राच्या मदतीने दीड किलोमीटर ते ५ किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेता येणार आहे. अर्जुन रणगड्याच्या १२० एमएम तोफेतून हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे. हे क्षेपणास्त्र वेगवेगळ्या वाहनांतून लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.