जम्मू : जम्मू आणि अनंतनाग पोलिसांच्या संयुक्त पथकाने हाती घेतलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला याला आज (शनिवार) जम्मूमध्ये अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत हिदायतुल्ला मलिक होता, अशी माहिती मिळाली आहे. (Lashkar-E-Mustafa Chief Hidayatullah Malik Arrested)
मिळालेल्या माहितीनुसार, हिदायतुल्ला मलिकच्या जम्मूमधील हालचाली वाढल्या असून, तो दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर जम्मू आणि अनंतनाग पोलिसांच्या एका संयुक्त पथकाने मोहीम हाती घेतली. या मोहिमेला यश मिळाले असून, हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आली आहे. हिदायतुल्ला मलिक याला केलेली अटक महत्त्वाची मानली जात आहे. जम्मू येथून अटक केली, तेव्हा हिदायतुल्ला मलिक याच्याकडून एक पिस्तुल आणि एक ग्रेनेड देखील हस्तगत करण्यात आले.
काश्मीर खोऱ्यात सक्रीय असेलल्या जैश-ए-मोहम्मद या दहशवतावदी संघटनेचा लष्कर-ए-मुस्तफा हा एक भाग आहे. जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीधर पाटील याबाबत माहिती देताना सांगितले की, जम्मू येथे असलेल्या कुंजवानीजवळ दहशवतवादी हिदायतुल्ला मलिक याला अटक करण्यात आली. अटकेच्या कारवाईवेळी त्याने पोलिसांवर हल्ला देखील केला होता.
गुड न्यूज! तब्बल ५५० दिवसांनी जम्मू काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेट सेवा; पण...
हिदायतुल्ला मलिक याच्या अटकेमुळे दहशतवादी कारवायांशी निगडीत महत्त्वाची माहिती भारतीय लष्कराच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अलीकडेच या दहशतवादी संघटनेला मदत करणाऱ्या काही जणांवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली होती. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी सुरक्षादलांच्या काही ठिकाणांची रेकी करत असल्याची बाब समोर आली होती. ही दहशतवादी संघटना अनंतनाग आणि बिजबिहाडा भागात दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होती, अशी माहिती मिळाली आहे.