श्रीनगर, दि. 1- जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा येथे सुरक्षा दलाच्या जवानांना चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. या परिसरात अबु दुजानासह तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराच्या जवानांना मिळाली होती. जवानांनी कारवाई करून दुजानासह २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती मिळते आहे.
दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते तेच घर सुरक्षा दलाच्या जवानांनी स्फोटकांनी उडवून दिलं असल्याची माहिती समोर येते आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. या लष्करानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, आणखी एका दहशतवाद्याचा शोध घेतला जातो आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकही सुरू होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. भारतीय जवानांनी दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते ते घर स्फोटकांनी उडवून दिल्याची माहिती मिळते आहे. हे घर स्फोटात उडवून दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार बंद झाल्याचं समजतं आहे. जवानांनी हकदीपुरा येथे शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत, अशीही माहिती मिळते आहे.
J&K: Encounter between Security forces and terrorists begins in Pulwama. 2-3 terrorists trapped
— ANI (@ANI_news) August 1, 2017
लष्कराच्या हिट लिस्टवर असलेल्या अबू दुजानावर 15 लाख रूपयांचं बक्षीस होतं. मूळचा पाकिस्तानचा असलेला अबू दुजाना दक्षिण काश्मिरमध्ये 2014 पासून अॅक्टिव्ह असल्याची माहिती आहे. तसंच तो 5 वेळा भारतीय लष्कराच्या तावडीतून सुटला होता. नुकतंच अबू दुजाना हा अल कायदाच्या काश्मीर शाखेत जाकिर मूसासह काम करत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. गेल्या वर्षी पंम्पोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अबू दुजाना मास्टरमाइंड होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले होते. बुरहान वानीच्या अंतिम संस्काराच्या वेळी तसंच काश्मीर खोऱ्यात इतर गोष्टींमध्ये विरोध प्रदर्शनाच्या दरम्यान अबू दुजाना सामील झाला होता.
जून महिन्यात सैन्यदलाकडून 12 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये अबू दुजाना उर्फ हाफिज, जुनैद अहमद मट्टू, बशीर वानी, शौतक ताफ उर्फ हुजैफा, वसीम अहमद या दहशतवाद्यांचा समावेश होता. सुरक्षा रक्षकांनी यावर्षा काश्मीरमध्ये आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.