श्रीनगर : काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी भाजपच्या तीन नेत्यांची हत्या झाली. यामागे लष्कर- ए- तोयबाचा हात असल्याचा दावा पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी केला आहे. दरम्यान, सुरक्षा प्रदान करण्यात आलेल्या व्यक्तींना पोलिसांनी आवाहन केले आहे की, सुरक्षा कर्मचाऱ्यांना सोबत घेतल्याशिवाय घरातून बाहेर निघू नये. गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी भाजपचे नेते फिदा हुसैन, उमर हाजम आणि उमर रशीद बेग यांची गोळ्या घालून हत्या केली. लष्कर- ए- तोयबाशी संबंधित संघटना द रेसिस्टेंस फ्रंटने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिसांनी सांगितले की, हल्ल्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त केले आहे. हे हत्याकांड पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून करण्यात आलेले आहे. अल्ताफ नावाच्या एका स्थानिक अतिरेक्याच्या कारमधून तीन अतिरेकी आले होते. फिदा हुसैन हे आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत एका कारमध्ये होते. अतिरेक्यांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या घातल्या. या प्रकरणात तोयबाच्या तीन अतिरेक्यांची नावे समोर आली आहेत. यात दुरू येथील एक स्थानिक अतिरेकी, निसार खांडे आणि खुदवानी येथील रहिवासी अब्बास यांचा समावेश आहे. अब्बास हा पूर्वी हिज्बुल मुजाहिदीनमध्ये होता.
भाजपच्या तीन नेत्यांच्या हत्येमागे लष्कर-ए-तोयबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 4:05 AM