ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - राजधानी दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाकडून दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो. गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला असून दहशतवादी दिल्ली आणि मुंबईत मेट्रोमध्ये हल्ला करण्याची शक्यता असल्याची सूचना दिली आहे. मुंबई आणि दिल्लीशिवाय सीमारेषेवरील पंजाब आणि राजस्थानमध्येही हल्ला होण्याची भीती आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबाचे 20 ते 21 दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसले असून छोट्या छोट्या ग्रुपमध्ये विभागले गेले आहेत. या सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सने प्रशिक्षण दिलं असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी अलर्ट मिळाल्यानंतर सुरक्षेत वाढ केली आहे. खासकरुन मेट्रो, रेल्वे स्थानक, एअरपोर्ट, पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेले हॉटेल्स, वर्दळीची ठिकाणं, धार्मिक ठिकाणं आणि स्टेडिअम येथे कडक सुरक्षाव्यवस्था असेल याची खात्री करण्यात आली आहे. घुसखोरी करणारे दहशतवादी प्रसारमाध्यमांचं लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखत असल्याचा अलर्ट आहे.
दहशतवादी कमी तीव्रतेचा स्फोट घडवत आत्मघाती हल्ला घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्यातील अधिका-याने वर्तवली आहे. कडक सुरक्षेव्यवस्थेसोबतच पोलिसांना शंका येईल तिथे तपासणी करण्याचे आदेश आहेत. याआधी मे महिन्यात अमेरिका गुप्तचर विभागातील एका अधिका-याने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना भारतात दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करत असल्याचं सांगत सूचित केलं होतं.