आग्रा- अकरा लाख एवढी मजबूत जवानांची संख्या असणाऱ्या भारतीय लष्कराने गेल्या १३ वर्षात दर तीन दिवसाआड एक जवान गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2005 पासून ते डिसेंबर 2017 पर्यंत एकूण 1 हजार 684 जवान शहीद झाले आहेत. सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आणि दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत, शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला दिलेल्या प्रत्युत्तरात आणि शांती मिशनमध्ये या जवानांनी प्राणाचं बलिदान दिलं आहे.
सोमवार 15 जानेवारी रोजी ७० वा लष्कर दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार 2017 या एका वर्षात भारताच्या 87 जवानांना वीरमरण आलं आहे. 23 डिसेंबर 2017 रोजी एका मेजरसहित ४ जवान शहीद झाले होते. त्यामुळे हा आकडा ९१ वर पोहचला आहे.
भारतीय लष्कराच्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये 11 अधिकाऱ्यांसह 86 जवान शहीद झाले. त्यानंतर 2015 मध्ये 4 अधिकाऱ्यांसहीत 85 जवान शहीद झाले. 2014 मध्ये 65, 2013 मध्ये 64, 2012 मध्ये 75, 2011 मध्ये 71, 2010 मध्ये 187, 2009 मध्ये 107, 2008 मध्ये 71, 2007 मध्ये 221 आणि 2006 मध्ये 223 जवान शहीद झाले. 2015 या वर्षात शहीद झालेल्या जवानांची संख्या जास्त असून केवळ 2015 या वर्षात 342 जवान शहीद झाले आहेत.