श्रीनगर - काश्मीरमधील दहशतवादी कारवायांविरोधात आघाडी उघडणाऱ्या भारतीय लष्कराला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे धक्का बसला होता. मात्र या हल्ल्यामुळे डगमगून न जाता भारतीय लष्कराने पुलवामा हल्ल्यानंतर गेल्या 21 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 18 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पुलवामा हल्ल्याची आखणी करणाऱ्यासह आठ पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. तसेच या वर्षातील पहिल्या 70 दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात 44 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, या दहशतवाद्यांमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांची संख्या अधिक आहे. कालापासून पिंगलिश येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पुलवामा हल्ल्यातील एका मास्टर माइंडचाही समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर लष्कराने आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी लष्कराच्या 15 व्या तुकडीचे जीओसी के.जे.एस ढिल्लन आणि जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. ''गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी 8 दहशतवादी हे पाकिस्तानी होते. तसेच त्यांनी भारतात घुसखोऱी करून दहशतवादी कारयावा करण्याचा कट रचला होता. गेल्या काही दिवसांमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरोधात काही मोठी ऑपरेशन्स तडीस नेली आहेत. तसेच पुढील काळातही अशी कारवाई सुरू राहील.'' असे ढिल्लन यांनी सांगितले.