नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 42 हजार 533 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (4 मे) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बाब समोर आली आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनूसार, गेल्या 24 तासात देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 1074 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे आता बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 27.52 टक्के असल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक भागांत नागरिकांना काही सूट देण्यात आली असली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आता नागरिकांवर आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणं टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे.
दररोज १ लाख चाचण्या
भारतामध्ये दर दहा लाख लोकांमागे फक्त 694 लोकांचीच कोरोना चाचणी होत आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, भारतात आतापर्यंत लाखो लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. देशात दररोज 1 लाख लोकांची चाचणी करण्याचे लक्ष्य आहे.