ऑनलाइन लोकमत
कोची, दि. 23 - भारतीय नौदलासाठी अनेक वर्षांपासून महत्त्वाची कामगिरी बजावणारी विमानवाहू नौका आयएनएस विराटला आज निरोप देण्यात आला. जगातील सर्वात जुनी विमानवाहू नौका अशी आयएनएस विराटची ओळख आहे. कोचीमध्ये आयएनएस विराटला निरोप देण्यात आला.
कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानची सागरी कोंडी करण्यामध्ये विराटने अत्यंत बहुमोल कामगिरी बजाविली होती. विराटने समुद्रामध्ये आतापर्यंत तब्बल 2,250 दिवस व्यतीत केले तसेच 10,94,215 किमी प्रवास केला आहे. सुमारे 27 वर्षे ब्रिटिश नौदलाची सेवा केल्यानंतर 1987मध्ये भारताने ही युद्धनौका खरेदी केली होती. तेव्हापासून ती भारतीय नौदलामध्ये कार्यरत होती.आतापर्यंत एकूण जवळपास 55 वर्ष विराटने सेवा केली आहे.
विराटच्या निरोप समारंभात दक्षिण विभाग मुख्यालयाचे मुख्याधिकारी,रिअर ऍडमिरल रवींद्र जयंती नाडकर्णी यांच्यासह अनेक ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे भारताच्या आत्तापर्यंतच्या पाचही नौदलप्रमुखांनी आयएनएस विराटवर सेवा बजावली आहे.
आयएनएस विराट आता कोचीतून मुंबईत दाखल होणार असून मुंबईत ही जगप्रसिद्ध युद्धनौका निवृत्त (डिकमिशन्ड) केली जाणार आहे.