नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन अंतिम टप्प्यात आले असतानाही कोंडी फुटण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसने ललित मोदी आणि व्यापमं घोटाळ्याच्या मुद्यावर आपल्या भूमिकेत कुठलाही बदल करण्याचे संकेत दिले नसून चिखलफेकीच्या राजकारणाबद्दल भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे.दुसरीकडे सत्ताधारी पक्षानेही काँग्रेसवर सत्रात अडवणुकीची आणि विध्वंसक भूमिका वठविल्याचा आरोप केला आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी निलंबित केलेले काँग्रेसचे २५ सदस्य सोमवारी लोकसभेत परततील. सभागृहात पुन्हा फटक दाखविणार काय, या प्रश्नाला उत्तर देण्याचे काँग्रेस नेत्यांनी टाळले. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी अधिवेशनाचे शेवटचे चार दिवस कामकाज होऊ द्या, असे आवाहन विरोधी पक्षांना केले आहे. परंतु विरोधकांवर त्यांच्या आवाहनाचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. संसदेच्या चालू अधिवेशनात आठ महत्त्वाची विधेयके पारित करायची आहेत, असे त्यांनी रविवारी चेन्नई येथे बोलताना सांगितले. सभागृहात या. चर्चा होऊ द्या. काँग्रेस खासदारांचे निलंबनही मागे घेतले जाऊ शकते, असे आवाहन मी काँग्रेसला केले होते, मात्र या पक्षाकडून कोणताही प्रतिसाद नाही
संसद अधिवेशनाचा अखेरचा टप्पाही वाया जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2015 10:24 PM