नवी दिल्ली : दिल्ली मुंबई रेल्वे प्रवास ताशी १५0 कि.मी. वेगाने अवघ्या १२ तासांत पूर्ण करणाऱ्या स्पॅनिश टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी शनिवारी होणार आहे. नवी दिल्ली स्टेशनवरून १0 सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी अत्याधुनिक टॅल्गो ट्रेन आपला प्रवास सुरू करेल व ११ सप्टेंबरला पहाटे २.२९ मिनिटांनी तिचे मुंबईत आगमन होईल. याआधीच्या चाचणीत ९ बोगींची टॅल्गो ट्रेन मुंबईला उशीरा पोहोचली होती. शनिवारी मात्र ही ट्रेन ११ तास ४४ मिनिटात दिल्ली मुंबई अंतर पार करेल. टॅल्गो ट्रेन ही वजनाने हलकी व वेगवान ट्रेन असून, स्पेनच्या टॅल्गो कंपनीने भारतातल्या सध्याच्या लोहमार्गावर त्याच्या विनामूल्य चाचण्यांना अनुमती दिली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार भारतातल्या सध्याच्या लोहमार्गात फारसा बदल न करता टॅल्गो ट्रेन ताशी १६0 ते २00 कि.मी. वेगाने धावू शकेल. या ट्रेनची तिसरी व अंतिम चाचणी मुंबई-दिल्ली अंतरावरच होईल. ताशी २00 कि.मी. वेगाच्या आपल्या पूर्ण क्षमतेने ही ट्रेन धावेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>सारा खर्च स्पेनचा
टॅल्गो ट्रेनसाठी विजेचा कमी वापर होतो. या ट्रेनमुळे भारतीय रेल्वे मोठ्या प्रमाणात विजेची बचत करू शकते. टॅल्गो ट्रेन भारतात पोहोचवण्याचा तसेच त्याच्या कस्टम ड्युटीसह सारा खर्च स्पेनची टॅल्गो कंपनीच करणार असल्याचेही रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)