नवी दिल्ली : मागील वर्षभरात भारतातील घातक रस्त्यांनी १५ ते ३४ वर्षे वयोगटातील ७५,००० युवकांचा बळी घेतला आहे. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ८२ टक्के पुरुष असल्याचे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या २०१४ च्या रस्ता अपघात अहवालात म्हटले आहे.२०१४ या वर्षात घडलेल्या रस्ता अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये ५३ टक्के हे १५ ते ३४ वर्षे वयोगटातील आहेत, तर ३५ ते ६४ वर्षे वयोगटातील अपघात बळींचा वाटा ३५.७ टक्के आहे, असे या अहवालात म्हटले आहे. जागतिक रस्ता अपघातात जखमी होणे हे १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात नमूद केले होते. या वयोगटातील ३.४ लाख युवक दरवर्षी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडतात.यावरून युवक आणि तरुणांना रस्ता सुरक्षेच्या मुद्यावर अधिक जागृत करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे दिसते. रस्त्यावर सुरक्षितपणे कसे चालावे हे समजावून सांगण्यात कुटुंबीय मोठी भूमिका बजावू शकतात. हे मोठे नुकसान आहे, असे मत रस्ता सुरक्षातज्ज्ञ रोहित बालुजा यांनी व्यक्त केले आहे. रस्ता अपघातांत जखमी झालेले बहुतांश लोकांना उर्वरित जीवन अपंग बनूनच घालवावे लागते आणि त्यांचा भार कुटुंबियांवर पडतो, असे दिसून आले आहे.अपघातात जखमी झाल्यानंतर अपंगत्व आलेल्यांचे कुटुंब गरिबीत ढकलले जाते, असे आशियन विकास बँकेच्या अभ्यासात आढळले असल्याची माहिती जिनेव्हा येथील आंतरराष्ट्रीय रस्ता महासंघाचे प्रमुख के.के. कपिला यांनी दिली.
मागील वर्षी देशात ७५,००० युवकांचा रस्ता अपघातात मृत्यू
By admin | Published: September 03, 2015 10:17 PM